Monday, July 21, 2014

50
1
बाहेर पडा या स्क्रीनच्या जगातून ! (संदीप वासलेकर)
- संदीप वासलेकर



प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या फेसबुक पेजवर एक मार्मिक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यांचे बहुतेक "फेसबुक-मित्र‘ 2011 मध्ये अण्णा हजारे यांचे अनुयायी होते. तेच मित्र 2012 मध्ये अरविंद केजरीवाल यांचे समर्थक झाले आणि तेच सर्वजण 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे चाहते झाले आहेत!

जनमत किती क्षणभंगुर असतं, हेच हे निरीक्षण दर्शवत नाही काय? भ्रष्टाचारी व निष्क्रिय राज्यकर्त्यांना लोक नक्कीच झुगारतील; त्याचबरोबर समाजाला आशा दाखवणाऱ्या नेत्यांनाही लोक आपल्या निष्ठा अल्पकाळच वाहतात. जर एखादा नेता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही असं वाटलं, तर लोक दुसऱ्या आशादायी नेत्याकडे वळतात; परंतु या मानसिकतेचा दुसराही एक अर्थ आहे. देशाच्या भवितव्याबद्दल कळकळ असणाऱ्या लोकांनादेखील संगणकाच्या स्क्रीनपलीकडं काय आहे, ते दिसत नाही. भ्रष्टाचार केवळ "पाल‘ आणून जात नाही, तर त्यासाठी "लोक‘ क्रियाशील असणं महत्त्वाचं असतं! कुणीतरी महाशक्तिमान "पाल‘ दिल्लीत बसून आपल्याला भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर काढेल, ही अपेक्षा अवास्तव आहे. खरोखरच भ्रष्टाचार घालवायचा असेल, तर गावोगाव भ्रष्टाचार निर्मूलन समित्या स्थापन करून स्थानिक अधिकाऱ्यांवर अंकुश आणण्याची गरज आहे. मात्र, हे संगणकाच्या अथवा टीव्हीच्या स्क्रीनवर लिहिलेलं दिसत नाही; म्हणून आपण तसा विचार करत नाही. स्क्रीनवर दिसतात फक्‍त टोप्या व मेणबत्या व आपल्याला वाटतं आपण एक टोपी घालून फेसबुकवर Like ची खूण करणार व बाकी काहीही न करता देश बदलणार! देशात बदल झाला नाही, तर अण्णा हजारे यांना सोडून दुसरा नेता शोधणार.
सध्या लोकमताचा कल नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. हे सरकार जर यशस्वी व्हायचं असेल, तर "मत दिलं, काम झालं‘ ही समजूत विसरली पाहिजे. टीव्हीवर दिसतात केवळ भाषणं व मतांची मागणी; पण केवळ मत देऊन दिवस बदलत नाहीत, त्यासाठी संगणक, टीव्ही व मोबाईलच्या स्क्रीनपलीकडे जाऊन पाहणं आवश्‍यक असतं. जर शहर व गाव स्वच्छ व्हावं, अशी इच्छा असेल, तर नगर प्रशासनाच्या उपायुक्‍तांकडं तशी मागणी करणं व ती मान्य होत नसेल, तर खासदारांना त्याचा पाठपुरावा करायला लावणं, हे आपलं कर्तव्य आहे. जर प्रशासनानं स्वच्छतेची मोहीम हाती घेतली, तर रस्त्याचा उकीरडा न करण्याची जबाबदारी आपली आहे. वेळेवर कर भरणं उद्योजक व व्यावसायिकांच्या हातात आहे, तरीही लाच मागितली तर करखात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मोर्चे काढणं सामाजिक व राजकीय संघटनांवर अवलंबून आहे. आपल्या मुलांना विविध जाती-धर्मांच्या मुलांशी मैत्री करणं, प्रमाणिकपणे वागणं, खूप गरज नसेल तर शिकवण्या न घेणं, नीतिमूल्यांची ओळख करून देणं या गोष्टी पालकांवर अवलंबून आहेत. या सर्व बाबतींत पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री काय करणार?
सरकारचं काम विकास व न्याय याला पोषक अशी धोरणं तयार करणं हे आहे. शेती, उद्योग, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत नागरिकांना भरपूर वाव व संरक्षण मिळावं म्हणून समतोल धोरण आखणं हे सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या संरक्षणाची हमी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारी तिजोरीचा वापर समाजाच्या वतीने विश्वस्त भावनेनं करणं व त्याचा दुरुपयोग होऊ न देणं हे सरकारचं उत्तरदायित्व आहे.

मात्र, स्वत:चा विकास व समाजाची बळकट बांधणी करायची असेल, तर केवळ सरकारवर विसंबून राहणं योग्य नाही. भले ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. आपण फक्‍त मुलांना इंजिनिअरिंगची प्रवेशपरीक्षा देण्यासाठी मेहनत करायला लावायची... त्यांना कधी मूलभूत विज्ञान, इतिहास, साहित्य, सामाजिक शास्त्रं यांची पुस्तकं वाचण्याची सवय लावायची नाही... आपण स्वत: दर दोन तासांनी "व्हॉट्‌सऍप‘वर निरोप इकडून तिकडं पाठवत राहायचे... अण्णा हजारे यांनी "जेल भरो‘चं किंवा नरेंद्र मोदी यांनी सक्रिय नागरिकत्वाचं आवाहन केलं, तर तेदेखील इतर किरकोळ विनोदांसारखं फॉरवर्ड करायचं... त्यावर गांभीर्यानं विचार करायचा नाही... प्रत्यक्षात कृती करायची नाही... हे सगळं असं करून कसं चालेल?

आयुष्याच्या यशाचं सार आपण स्वत: अथवा मुलांनी अमेरिकेत स्थायिक होण्यात मानायचं... कारण टीव्हीच्या स्क्रीनवर अमेरिकेतली चकचकीत शहरं, मोठी घरं व मोठ्या गाड्या दिसतात, तीच अमेरिका मानायची... त्या स्क्रीनबाहेर असलेली अमेरिकी लोकांची कल्पकता, उद्योजकता, शिस्त, संशोधनाची आवड, समता यांत रस घ्यायचा नाही... तिथं जाऊनही संगणकाच्या स्क्रीनवर फेसबुकचं पान उघडायचं व पुण्याच्या "बालगंधर्व‘मधल्या संगीतविषयक कार्यक्रमांबद्दल चर्चा करायची...! असे हे आपण !!

भारतीय जीवनात स्क्रीनचं महत्त्व सध्या खूपच वाढलेलं आहे. तिथं एका रात्रीत कोणत्याही क्षेत्रातील व्यक्‍ती कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ होऊ शकते. एक नागरिक म्हणून परराष्ट्र धोरण, दहशतवाद, राजकीय परिवर्तन व सरकारी धोरणांवर मतप्रदर्शन करण्याचा सिनेनटांपासून "सोसायटी‘ पार्टीवाल्यांना अधिकार आहे! मात्र, हे लोक स्क्रीनवर येऊन गंभीर विषयांतले "झटपट तज्ज्ञ‘ बनतात. स्क्रीनबाहेर पडल्यावर हातात कॉकटेलचा प्याला घेऊन आता बराक ओबामा यांनी काय केलं पाहिजे, यावर तावातावात सल्ला देतात.

मी ई-सकाळवर माझ्या लेखासंबंधी आलेल्या सर्व प्रतिक्रिया नेहमी वाचतो. अनेक वाचकांनी पुनःपुन्हा हा प्रश्‍न विचारला आहे ः ""संदीप वासलेकर फक्‍त "सकाळ‘मध्येच का लिहितात? ते माध्यमांत; विशेषत: इंग्रजी माध्यमात का दिसत नाहीत?‘‘ म्हणजे मी स्क्रीनवर का दिसत नाही? इराकमधला दहशतवाद अथवा नवाझ शरीफ यांचा दिल्लीदौरा अशा विषयांवर चर्चा का करत नाही?‘‘ या प्रश्‍नांची उत्तरं सोपी आहेत. स्क्रीनवरचं आयुष्य जगून इराक अथवा पाकिस्तानबद्दल उथळ चर्चा करण्यासाठी माझ्याकडं वेळ नाही. इराकच्या समस्या कमी करण्यासाठी अथवा पाकिस्तानी हल्ल्यापासून भारताची संरक्षणव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष हातभार लावणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी फक्‍त "सकाळ‘मध्येच का लिहितो? "सकाळ‘ स्क्रीनपुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्रातल्या गावागावांत व खेड्याखेड्यांत पोचतो व समाजनिर्मितीच्या मुद्द्यावर सर्वसामान्य वाचकांशी मला "सकाळ‘मधून संवाद साधता येतो.

स्क्रीनवरच्या जगात अनेक सोईचे समज झाले आहेत. ज्ञान प्राप्त करणं म्हणजे इंटरनेटवरची माहिती गोळा करून "कट-पेस्ट‘ करणं असं वाटतं. राजकारण करणं म्हणजे नेत्याच्या फेसबुकवर Like म्हणून खूण करणं... उद्योग करणं म्हणजे सोशल नेटवर्कचा वापर करून कपडे अथवा कलाकृती विकणं... या जगात ज्ञानोपासनेसाठी ऍडम स्मिथ अथवा कार्ल मार्क्‍स, कौटिल्य अथवा डॉ. राधाकृष्णन, ऍरिस्टॉटल अथवा इब्न खल्दुन यांची पुस्तकं वाचावीत, असं कुणाला वाटत नाही. त्या जगात राजकारणासाठी खेड्यापाड्यांत किंवा घराघरांत जाऊन लोकांची अपेक्षा समजून घेण्याची गरज वाटत नाही. या जगात उद्योगासाठी संशोधन केंद्रं उभी करून नवीन वस्तू उत्पादन करण्याची, त्यावर पेटंट घेण्याची आवश्‍यकता वाटत नाही.

विश्वंभर चौधरी यांचे फेसबुकवरचे मित्र दरवर्षी नवनवीन नेते शोधतात. याचं कारण, काही नेत्यांनी केलेला अपेक्षाभंग, हे आहे! मात्र, त्याचबरोबर "याचि स्क्रीन, याचि डोळा‘ हे जीवनतत्त्वही आहे. याचा अर्थ मी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधात आहे असा नव्हे! किंबहुना भारतानं विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करून येत्या 50 वर्षांसाठीचा मार्ग आखावा असं मला वाटतं. संगणक, मोबाईल, दूरचित्रवाणीसंच ही सर्व उत्कृष्ट साधनं आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास बरेच फायदे होतील. मात्र, ही साधनं जीवन सुधारण्यासाठी असतात. "साधन म्हणजेच जीवन‘ अशी गैरसमजूत झाली, तर उथळ पाण्यातही समाज बुडू शकतो! स्क्रीनचा एक साधन म्हणून वापर जरूर करावा; परंतु स्क्रीनलाच आपलं जीवन व जग मानू नये! स्क्रीनच्या जगातून आपण बाहेर पडलो, तर आपलं आयुष्य नक्कीच समृद्ध होईल!